Monday, 7 January 2019

|| अभ्यंतर शोधूनि पाहे ||


- © सचिन जहागिरदार 

होता अज्ञानाचे बिळीं | डसला देहभाव अंगुळी || १ ||

अहंबिख डसतां व्याळ | वैद्य पाचार गोपाळ || २ ||

उगवतां दिवसीं डसला तोंडी | चढतां वळतसे मुरकुंडी || ३ ||

सुखदुःखाचिया जाणा | लहरी येताति दारुणा || ४ ||

विषयनिंब लागे गोडू | धान्य हरिनामाचें कडूं || ५ ||

वरि वरि हात झाडुनि काय | अभ्यंतर शोधूनि पाहे || ६ ||

रामदासा नित्य उतार | जवळा वैद्य रघुवीर || ७ ||

- श्रीसमर्थांचा गाथा अभंग क्रमांक  ९९९


   आपल्याला एखाद्या जहरी सापाने दंश केला आहे , ही कल्पना सुद्धा नकोशी वाटते. परंतु एक अतिविषारी सर्प जन्मजन्मांतरे  झाली तरी आपल्याला क्षणोक्षणी दंश करतच आहे. त्याच्या विषाने आपण नानाविध प्रकारच्या वेदना भोगत आहोत. तरीदेखील आपल्याला या सर्पदंशाची जाणीव होत नाही. उलट आपण त्याला जणू कवटाळून बसलो आहोत. हा अतिविषारी सर्प म्हणजे देहभाव होय. ‘मी अमका तमका आहे.’ असे आपण स्वतःला समजत असतो. हाच देहभाव होय.  जीवाचे सत्यस्वरूप आनंदमय असताना, अज्ञानामुळे त्याने स्वतःला देह  मानले. तो जीव देहाबरोबर येणारे सुखदु:ख भोगत राहतो. पुन:पुन्हा जन्मत आणि मरत राहतो. या देहभावाच्या सर्पदंशापासून सुटका होण्यासाठी समर्थ रामदास स्वामी आपल्याला रामरूपी वैद्याजवळ जाण्याचा उपदेश करत आहेत. सर्पाचे रूपक वापरून समर्थांनी देहबुद्धीचे दु:खदायक स्वरूप अगदी सोप्या शब्दांत समजावले आहे , हे त्यांच्या काव्यप्रतिभेचे सामर्थ्य आहे .

   अज्ञानाच्या बिळामध्ये देहभाव नावाचा अंगठ्याएवढा अतिविषारी सर्प राहतो. एखादी वस्तू जशी आहे तशी न जाणणे म्हणजे अज्ञान. मिथ्या जगाला सत्य मानणे हे अज्ञान होय. आत्मविस्मृत होउन स्वतःला देह समजणे हे अज्ञान होय. जीवाला जसा स्थूलदेह असतो, तसाच सूक्ष्मदेहदेखील असतो. आपल्याला मन आहे याचा सर्वांनाच अनुभव येतो. पण हे मन तर दिसत नाही. जसे मन असते तसाच सूक्ष्मदेह असतो. त्यालाच लिंगदेह असेही म्हटले जाते. हा लिंगदेह अंगुष्ठमात्र अर्थात अंगठ्याएवढा आहे, असे कठोपनिषदाचे प्रमाण आहे. त्याचाच संदर्भ समर्थांनी इथं दिला आहे. या अंगुष्ठमात्र लिंगदेहामध्येच अनेक जन्मांचे संस्कार आणि वासना साठलेल्या असतात. येथेच देहभाव सुरू होतो. असा अज्ञानरूपी बिळामध्ये असलेला अंगठ्याएवढा देहभावाचा सर्प जेव्हा कडकडून दंश करतो तेव्हा काय होते, त्याचे वर्णन पुढील चरणांमध्ये  आहे.

   या सर्पाने दंश केल्यावर जे विष भिनते त्याला अहंकार, असे म्हटले आहे. या विषाला जर उतार पडावा, असं वाटत असेल, तर गोपाळकृष्ण परमात्म्याला शरण जा. त्याला मनापासून बोलव. त्याच्याशिवाय हे विष कुणी उतरवू शकत नाही, असं समर्थ म्हणतात. दिवस सुरु होतानाच हा देहभावाचा सर्पदंश झाला, जसजसा दिवस पुढं जाईल तसतसं हे विष अंगात भिनत जाईल. त्याने शरीर विकृत होईल. अर्थात जन्म झाल्यापासूनच ‘मी हे शरीर आहे.’ या अज्ञानाची सुरुवात होते. वय वाढेल तसा हा देहभाव आणखी बळकट होतो आणि शेवटी त्यातच मृत्यू गाठतो. अहंकाराचे विष भिनल्यावर साहजिकच वेदना होणार. देहाला त्याच्या प्रारब्धानुसार कधी सुख मिळणार, तर कधी दु:ख सहन करावे लागणार. विषयजनित सुख आणि दु:ख दोन्ही नश्वर आहेत. हे तात्कालिक सुख-दु:खसुद्धा अहंकाररूपी विषाच्या वेदनाच आहेत. या अहंकारी जीवाला विषयरूपी कडूलिंब गोड लागतो. देहाला सुख देणारे विषय मिळावेत यासाठीच त्याची सगळी धडपड सुरू असते. परंतु याच जीवाला हरीनाम कडू लागते. अहंकारी जीवाच्या तोंडी नाम येत नाही. उलट हिरण्यकशिपू राक्षसाप्रमाणे ते नामाला विरोध करतात. अहंकारी जीव नामामृताचे रसपान करू शकत नाही, हा देहभावाचा परिणाम आहे.

   शरीरामध्ये खोलवर विष भिनले की प्राणी हातपाय झाडू लागतो. अर्थात हे अहंकाराचे विष भिनले की, कधी तरी दु:खाने पश्चातापदग्ध होण्याची वेळ येतेच. अशा वेळी वरवरचे उपाय करून उपयोग होत नाही. हे अहंकाराचे विष अन्तःकरणामध्ये आहे. त्यामुळे ते अंतःकरण अगदी तळापासून तपासले पाहिजे. आपला आपण त्याचा शोध घेतला पाहिजे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जो ‘मी रामाचा दास आहे.’ अशा भावामध्ये, अगदी खरेपणाने रामरायाची भक्ती करतो, त्याला हे अहंकाराचे विष बाधू शकत नाही. कारण असे रामदास्य करणाऱ्या भक्तावर प्रत्यक्ष रघुवीर प्रभू श्रीरामचंद्रांची कृपा असते.

   या अहंकाराच्या विषाला उतार पडण्यासाठी रामनाम हे औषध तर प्रभू श्रीरामचंद्र हेच एकमेव वैद्य आहेत.

No comments:

Post a Comment

|| अभ्यंतर शोधूनि पाहे ||

- © सचिन जहागिरदार  होता अज्ञानाचे बिळीं | डसला देहभाव अंगुळी || १ || अहंबिख डसतां व्याळ | वैद्य पाचार गोपाळ || २ || उगवतां ...