- © सचिन अशोक जहागिरदार
·
पार्श्वभूमी
योगीराज श्रीकल्याणस्वामी हे समर्थ रामदास स्वामींचे पट्टशिष्य होते. आपले संपूर्ण जीवन त्यांनी श्रीसमर्थचरणी अर्पण केले होते. श्रीकल्याणस्वामींनी समर्थांची सेवा हेच आपल्या जीवनाचे सर्वस्व
मानले होते. सन १६७८च्या सुमारारास श्रीसमर्थांनी त्यांना सद्गुरुपदावर
अधिष्ठित करून जगदोद्धारासाठी डोमगाव, परंडा या परिसरामध्ये जाण्याची आज्ञा केली. त्यानंतर श्रीकल्याणस्वामी तीन तपे या परिसरामध्ये श्रीसमर्थकार्य करत होते. श्रीसमर्थांच्या आज्ञेवरून श्रीकल्याणस्वामींनी अनेक शिष्यांना ‘रामनामा’ची दीक्षा देऊन धर्मसंस्थापनेची परंपरा अखंडित ठेवली. श्रीसमर्थांच्या अस्थीविसर्जनाचा योग साधून
योगीराज श्रीकल्याणस्वामींनी अधिक आषाढ शुद्ध त्रयोदशी शके १६३६ ,सन १७१४ मध्ये परंडा, जि. धाराशिव येथे देह ठेवला. त्यांचे पार्थिव डोमगाव येथे आणून श्रमहारिणी सीना नदीच्या
तटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथेच आजचे भव्य समाधी मंदिर उभारण्यात आले. हाच श्रीकल्याणस्वामींचा डोमगाव मठ होय .
डोमगाव एक छोटेसे खेडे असून उस्मानाबाद (मूळ नाव धाराशीव) जिल्ह्यातील परंडा तालुक्यामध्ये आहे. कुर्डुवाडी हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.
श्रीकल्याणस्वामींच्या अवतारसमाप्तीनंतर त्यांचे शिष्य
श्रीमुद्गलस्वामी हे मठाधिपती झाले . श्रीमुद्गलस्वामींचे शिष्य श्रीरामाजीस्वामी हे डोमगाव
मठाचे तिसरे मठाधिपती. या पिढीपासून डोमगाव मठामध्ये वंशपरंपरेने मठाधिपती परंपरा
सुरु झाली. त्यानुसार ज्येष्ठ पुत्र हा ब्रह्मचारी राहून मठाधिपती
म्हणून श्रीसमर्थसेवा करत असे तर कनिष्ठ पुत्र गृहस्थधर्माचे पालन करून स्वत:चा ज्येष्ठ पुत्र पुढचा मठाधिपती म्हणून देत
असे. अशा श्रीसद्गुरूभक्तीपरायण कुळामध्ये श्रीसखाराम महाराज
यांचा अवतार झाला.
श्रीसखाराम महाराजांचा जन्म कौशिक गोत्रोत्पन्न देशस्थ ऋग्वेदी
ब्राह्मण कुटुंबामध्ये सन १८००च्या सुमारास झाला. श्रीसखाराम महाराजांची जन्मतिथी अद्यापपर्यंत तरी उपलब्ध
नाही. त्यांचे पूर्वज चार पिढ्यांपासून योगीराज श्रीकल्याणस्वामी मठ, डोमगाव येथे मठाधिपती म्हणून श्रीसद्गुरुसेवेमध्ये लीन होते. त्यांची गुरुशिष्यपरंपरा खालीलप्रमाणे...
श्रीसमर्थ रामदास स्वामी – योगीराज श्रीकल्याणस्वामी – श्रीरामाजी – श्रीबाळाजी – श्रीतात्याबा – श्रीसखाराम महाराज – श्रीभवानीदास – श्रीदत्तात्रय – योगीराज – भाऊसाहेब
·
कीर्तनभक्तीचे अलौकिक आचार्य
नित्यनवा हव्यास धरावा | साक्षेप अत्यंतची करावा |
हरिकीर्तनें भरावा | ब्रह्मगोळ अवघा ||
- श्रीमत दासबोध ४.२.५
श्रीसखाराम महाराज हे कीर्तनभक्तीचे अलौकिक आचार्य होते. सात्त्विक संस्कार, दृढ उपासना व
गुरुकृपा या
त्रिवेणी संगमामध्ये सुस्नात होत श्रीमहाराजांचे शास्त्र आणि विविध ग्रंथांचे अध्ययन झाले होते. तसेच त्यांच्या आवाजातील माधुर्य आणि
संगीताचे उपजत ज्ञान
यामुळे त्यांच्या कीर्तनाद्वारे प्रसवणार्या भक्तीगंगेत श्रोतृवर्ग रममाण होऊन
जात असे. श्रीमहाराजांनी बहुसंख्य गावांमध्ये श्रवणीय कीर्तन करून तत्कालीन समाजामध्ये रामभक्तीचा फार मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केला. त्यांच्या रामदासी कीर्तनांमध्ये मुख्यत: भक्ति, ज्ञान, वैराग्य, साधना या विषयांवर आधारित निरुपण असे. त्याला अनुरूप अशी कथाआख्याने रसाळपणे कथन करून जोडीला नादमय संगीत गायनाने श्रोतृवृंद भक्तीमध्ये तन्मय होऊन जात असे. महाराजांच्या कीर्तनांची लोकांना इतकी गोडी लागली की
त्यांचे कीर्तन श्रवण करून भक्तीगंगेत डुंबण्यासाठी दूरदूरहून गावकरी मोठ्या
संख्येन येऊन हजेरी लावत असत.
या संदर्भात परंपरेने एक कथा सर्वत्र ऐकायला मिळते. एका गावामध्ये श्रीकृष्ण मंदिरात श्रीसखाराम महाराजांचे कीर्तन रंगात आले होते. भक्तीरसाने परिपूर्ण अशा कीर्तनामध्ये आनंदाला उधाण आले होते. त्याचवेळी त्या जनसमूहाच्या बाजूने एक सरदार आपल्या फौजफाट्यासह चालला होता. मंदिराच्या आत आणि बाहेरील तल्लीन श्रोते पाहून कुतुहलापोटी फौजफाटा तेथेच उभा राहिला. सरदाराने मंदिरात डोकावून बघितले. श्रीसखाराम महाराज तल्लिन होऊन कथा निरुपणात
एकरूप होत श्रीकृष्णाच्या सगुण रूपाचे वर्णन करीत होते. त्यावेळी श्रीमहाराजांची तन्मयता पाहून सरदाराने महाराजांपुढे जाऊन विचारणा केली, ‘‘तुम्ही मला श्रीकृष्णाचे दर्शन घडवू शकता का?’’ कथा निरुपणात अचानक ऐकलेल्या प्रश्नामुळे त्यांनी मंदिरामधील एका प्रतिमेतील सगुणध्यानाचे वर्णन सुरू केले. त्या प्रतिमेमध्ये भगवती राधाराणी श्रीकृष्णांना विडा देत असल्याचे भावचित्र होते. प्रश्न विचाणारा तो सरदार महाराजांच्या सगुण ध्यान वर्णनात तल्लीन होऊन गेला आणि त्याला प्रतिमेतील भगवान श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष दर्शन घडले. सरदार मनोमनी धन्य होऊन कीर्तन संपेपर्यंत
तेथेच थांबला. श्रीमहाराजांनी घडविलेल्या श्रीकृष्ण दर्शनामुळे तो सरदार श्रीसखाराम महाराजांना शरण आला .
त्याने काही गावांची जहागीर श्रीसखाराम महाराजांच्या चरणी अर्पण केली. परंतु ‘भक्तीप्रेमधन’ प्राप्त झालेल्या त्या निस्पृह महात्म्याने ती सर्व जहागीर स्वतःकडे न ठेवता ज्येष्ठ बंधुंकडे सुपूर्द केली आणि कृतार्थ
झाले. या प्रसंगानंतरच श्रीसखाराम महाराजांच्या वंशजांना ‘जहागिरदार’ हे आडनाव प्राप्त झाले. अशा त्यागी, वैराग्यमय आणि भक्तीमय जीवनामुळेच श्रीसखाराम महाराज ‘सद्गुरु’पदाचे अधिकारी झाले.
श्रीसखाराम महाराज यांची योगीराज श्रीकल्याणस्वामींच्या
चरणी अनन्य निष्ठा, भक्ती होती. जेव्हा जेव्हा महाराज कीर्तनासाठी अन्य गावांमध्ये प्रस्थान करत असत, त्यानंतर कीर्तनसेवा यथासांग पूर्ण करून पुनरपि मठामध्ये पदार्पण करीत त्यावेळी प्रथम श्रीकल्याणस्वामींच्या समाधीपाशी विनम्रतेने उभे राहून आपल्या
कीर्तनसेवेचा सविस्तर वृत्तांत निवेदित करीत. त्यावेळी समाधीतून प्रतिसादात्मक ‘हुंकार’ ऐकू येत असे. श्रीसखाराम महाराजांवर पूर्ण गुरुकृपा होती.
या अलौकिक अधिकारामुळे श्रीक्षेत्र डोमगाव मठाच्या गुरुपरंपरेमध्ये श्रीसखाराम महाराजांचे स्थान अग्रगण्य आहे. या आशयाचा एक श्लोकही डोमगाव मठातील उपासनेमध्ये म्हटला जातो ,
हनुमंत माझा गुरु रामदास। हनुमंतस्वरूपी सखा विलास।
हनुमंतस्वरूपी मना लीन होई। हनुमंतस्वरूपी सखाराम पाही॥
श्रीसखाराम महाराज आणि श्रीहंसराज स्वामी
श्रीहंसराजस्वामी हे ब्रह्मविद सत्पुरुष रामदासी
संप्रदायामध्ये होवून गेले. ते श्रीसखाराम महाराज यांचे समकालीन आणि अंतरंग
स्नेही होते .श्री हंसराज
स्वामींचे संन्यासनाम श्रीनारायणतीर्थ असे आहे. समर्थशिष्य
श्रीउध्दवस्वामी परंपरेतील हे सातवे सत्पुरुष. श्रीहंसराज स्वामी
हे अद्वैतवेदांती होते. ‘ज्ञानादेव तू कैवल्यं|’ या श्रुतीवचनानुसार
त्यांनी ज्ञानमार्गाने साधना करून कैवल्य प्राप्त करून घेतले. त्यांच्या या
परमहंस स्थितीमुळेच त्यांना श्रीहंसराजस्वामी हे नामाभिधान प्राप्त झाले. त्यांनी आगमसार, लघुवाक्यवृत्ती, वेदेश्वरी हे
अलौकिक वाङ्मय निर्माण केले.
एकदा श्रीहंसराजस्वामी आपल्या तीर्थयात्रेमध्ये श्रीकल्याणस्वामी समाधीस्थान डोमगाव येथे आले. त्याचवेळी मठामध्ये श्रीसखाराम महाराजांची कीर्तनगंगा प्रवाहित होत होती. ते दिव्य कीर्तन ऐकून श्रीहंसराजस्वामींची ब्रह्मानंदी टाळी लागली.त्यांना श्रीसखाराम महाराजांचा अधिकार कळाला. परंतु त्यांनी स्वतःची ओळख कोणाला सांगितली
नाही.
मनीं भाविले की हा असे ज्ञानी | परी आजची ओळखी न देवू यालागोनी ||
- हंसपध्दती ७.७.३३
नंतर मात्र अंतरस्थितीचीया खुणा दोघाही अंतर्निष्ठ
सत्पुरुषांनी जाणल्या. त्यानंतर उभय महानुभावांमध्ये अकृत्रिम, अतुट व अपरंपार असा स्नेहबंध जुळला. या हृदयीचे त्या हृदयी मिलन झाले. श्रीहंसराजस्वामींचे श्रीसखाराम महाराजांच्या सान्निध्यात सन १८३३ ते सन १८४० डोमगाव मठामध्ये वास्तव्य झाले .
सखारामबावा हा भगीरथ | तेणें प्रयत्न करोनी भागीरथी समर्थ |
आणिली सर्वां करावया सनाथ | परांडे काशीवरी ||
- हंसपध्दती ७.७.३३
श्रीहंसराजस्वामी, श्रीसखाराम महाराज आणि श्रीजनार्दनपंत उत्पात या तीन सत्पुरुषांनी एकत्रितपणे श्रीक्षेत्र पंढरपुरची तीर्थयात्रा केली. यात्रे दरम्यान श्रीसखाराम महाराज व श्रीहंसराजस्वामी यांचा आध्यात्मिक सुखसंवाद होत होता. या पंढरपूरच्या यात्रेदरम्यान श्रीहंसराज
स्वामींना श्रीसखाराम महाराजांच्या ठायी श्रीसमर्थ रामदास स्वामींचा सगुण
साक्षात्कार झाला.हा
प्रसंग ‘हंसपध्दती’ या ग्रंथामध्ये सविस्तरपणे वर्णिलेला आहे ...
अंतर्हेतू नारायणहंसांचा | एकदा सज्जनगड पाहावा साचा |
एकें दिनी मध्यान्हीं भास स्वप्नाचा | जाला तो बोलिजे ||
जनार्दन उत्पाताचे माडी आंत | त्रिवर्गहि निद्रा करिती निवांत |
संप्रदायी विजने असती घालित | तेणें निद्रिस्थ त्रिवर्ग ||
तंव स्वप्नामाजी नारायणहंसासी | बैसिलीयापरी वाटे आसनासी|
मांडीवरी देखिलें सखारामबावासी | उसें देऊनी निजलेती ||
सखारामे कंठीं हात घालुनी | म्हणती ओळखिले काय मज लागुनी |
नारायणहंस म्हणती मुखेकडुनी | किं डोमगावकर असा ||
तंव बोलती कैचा सखाराम | कोठोनी काढिले गांव डोम |
मी असे सज्जनगडधाम-| निवासी समर्थ ||
- हंसपध्दती ७.७.३८ ते ४२
खरोखर
या विलक्षण प्रसंगामध्ये या दोन्ही सत्पुरुषांच्या अधिकाराचे दर्शन होते.
साधू दिसती वेगळाले | परी ते स्वरूपी मिळाले |
अवघे मिळून एकची जाले | देहातीत वस्तू ||
-श्रीमत दासबोध
परमहंस स्थितीतील श्रीहंसराजस्वामींना अनेकदा देह्बोध राहत
नसे. त्यावेळी श्रीसखाराम महाराज स्वतः त्यांची सेवाशुश्रुषा करत
असत. उपरोक्त उल्लेखित आगमसार इत्यादी ग्रंथांचे लेखन
श्रीहंसराजस्वामींनी डोमगाव मठाध्ये केले आहे .
श्रीस्वामी आपल्या समवेत असलेल्या श्रीमहाराजांना आत्मवत मानत होते. ते आपल्या शिष्यांना नेहमी सांगत असत की, मी आणि महाराज अभिन्न आहोत. आम्हा उभयतांना कधीही वेगळेपणाने पाहू नका.
श्रीमहाराजांच्या समाधीनंतर श्रीस्वामीजी डोमगावहून परंड्यामध्ये कायमस्वरूपी वास्तव्यासाठी आले. श्रीसखाराम महाराजांच्या शिष्यांनी श्रीहंसराजस्वामींची मनोभावे सेवा करून महाराजांनी केलेल्या संस्कार व अकृत्रिम
अभिन्नतेचा परिचय करून दिला.
बहुत कासयासी बोलणे | उभयतांचे देह मात्र दोन |
परी एकरूप अन्तःकरण | कोणतेही काळी ||
-हंसपद्धती ७.७.१२३
·
श्रीसखाराम महाराजांची शिष्यपरंपरा
१)सत्शिष्य श्रीभाऊ महाराज काटकर
१९ व्या शतकात वारकरी संप्रदायात श्रीभाऊ महाराज काटकर नामक
सुविख्यात कीर्तनकार
होऊन गेले. त्यांचे कीर्तनातील प्राविण्य व लालित्य इतके अपरंपार
होते की त्यांच्या कीर्तन श्रवणाचा आनंद घेण्यासाठी मोठमोठे विद्वान, संन्यासी आणि संतमंडळी आवर्जून उपस्थित असत. महाराष्ट्रातील कीर्तन परंपरा आणि अध्यात्म
क्षेत्रात श्रीभाऊ महाराजांना फार मोठा अधिकार व मान्यता होती. यात विशेष गोष्ट म्हणजे श्रीभाऊ महाराज हे श्रीसखाराम महाराजांचे शिष्य होते. श्रीसखाराम महाराजांची कृपादृष्टी व आशीर्वाद यामुळे श्रीभाऊ महाराजांना कीर्तनभक्तीची प्रेरणा व सामर्थ्य लाभले. परिणामस्वरूप श्रीभाऊ महाराजांच्या कीर्तनातील प्रत्येक बारीक-सारीक वैशिष्ट्यांवर श्रीसखाराम महारांजाचा सखोल ठसा उमटलेला होता. श्रीभाऊ महाराजांना श्रीसखाराम महाराजांकडून कीर्तन भक्तीचा संपन्न व
श्रवणीय असा कीर्तन ठेवा लाभला हे त्यांचे भाग्य होय!
२)श्रीरामचंद्रबाबा पाटील
तसेच सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये लऊळ नावाचे एक
गाव आहे. या लऊळमधील श्रीरामचंद्रबाबा पाटील हे श्रीसखाराम महाराजांचे
शिष्य होते.
श्रीरामचंद्रबाबांचे शिष्य श्रीवासुदेव महाराज कुवळेकर हे होते. श्रीकुवळेकर महाराजांनी गतशतकामध्ये
श्रीमसुरकर महाराजांसमवेत धर्मसंस्थापनेचे मोठेच कार्य केले आहे.
३)श्रीभवानीदास महाराज
श्रीसखाराम महाराज यांचे सुपुत्र श्रीभवानीदास महाराजही आपल्या पित्याप्रमाणे
श्रेष्ठ महात्मा होते. श्रीभवानीदास महाराजांच्या कृपेमुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर
गावचे राजेदेशमुख परिवारात अनेक वर्षानंतर वंशवृद्धी होऊन पुत्रप्राप्ती झाली. रावेर मध्ये श्रीभवानीदास महाराजांच्या हस्ते श्रीमारुती मंदिराची स्थापना केली. त्या मंदिरात आजही देशमुख परिवार हनुमंत
उपासना व सेवा करीत आहेत
४)श्रीदत्तात्रय महाराज
अवतारी सत्पुरुष श्रीधरस्वामी यांचे पूर्वाश्रमातील पिता श्रीनारायणराव पत्की व चुलते श्रीगोविंदराव पत्की या उभयतांना श्रीसखाराम महाराज यांचे नातू श्रीदत्तात्रयस्वामी यांनी अनुग्रह दिला होता .
·
वाङ्मय
श्रुति उपनिषदांचेही सकळ| अर्थ होऊं लागती प्रांजळ |
सखारामबावासी केवळ | वस्तुतंत्रता बाणली ||
-हंसपद्धती ७.७.१२९
श्रीसखाराम महाराज यांचे बृहत् जीवनचरित्र उपलब्ध नाही परंतु समर्थकृपेने त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी दोन ग्रंथ धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरात मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. ‘पंचीकरण’ आणि ‘रामगीता’ असे ते २ ग्रंथ आहेत. या दोन्ही ग्रंथांचे अवलोकन व अध्ययन केल्यावर श्रीमहाराजांच्या
अलौकिक अध्यात्मिक अधिकाराची साक्ष मिळते
१)पंचीकरण
पंचीकरण हा ग्रंथ पिंड तथा ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि प्रलय या विषयाला अनुसरून लिहिलेला आहे. हा गद्य ग्रंथ आहे. यामध्ये पंचीकरणाचे कोष्टक आणि योगमार्गातील षट्चकांच्या आकृत्या सामावलेल्या आहेत हे विशेष होय. पंचमहाभुतांनी बनलेले पिंड आणि ब्रह्मांड यावर सविस्तर विवेचन असल्यामुळे या ग्रंथाला ‘पंचीकरण’ असे संबोधले जाते. त्या ग्रंथात अन्नमय, प्राणमय, मनोमय, आनंदमय आणि विज्ञानमय अशा पाच कोषांची तसेच त्यासंबंधी अन्य सर्व माहिती विस्तृतपणाने
आली आहे. थोडक्यात असे म्हणता येईल की वेदांताची संपूर्ण ज्ञानप्रक्रिया या ग्रंथामध्ये सामाविष्ट केली आहे.
२)रामगीता
श्रीसखाराम महाराजांनी लिहिलेला दुसरा अनुपमेय ग्रंथ म्हणजे ‘रामगीता’ होय. अध्यात्मरामायणाच्या उत्तरकांडातील मूळ संस्कृत रामगीतेचा अनुवाद यात सामावलेला आहे. या ग्रंथातही अद्वैत वेदांताचे प्रतिपादन आहे. ज्ञानयोगाने स्वरूपानुभव प्राप्तीचा मार्ग सांगणारा हा ग्रंथ आहे.
·
समाधी प्रसंग
श्रीसखाराम महाराज जनसामान्यांमध्ये रामभक्तीचा प्रसार करण्यासाठी भाग्यनगर (हैद्राबाद) येथे गेले. तेथे त्यांचे वास्तव्य ‘भोईगुडा’ नामक परिसरात होते. त्यावेळी हा सारा प्रांत आक्रमकांच्या
विघातक कृत्यांमुळे भयग्रस्त झाला होता. तेथे श्रीमहाराजांनी स्वहस्ते ‘श्रीदासमारुती’ची प्रतिमा निर्माण करून तिची प्रतिष्ठापना केली. सर्व लोकांमध्ये श्री मरुतीच्या उपासनेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी
महाराजांनी तेथे भव्य असे श्रीमारुती मंदिर निर्माण केले. अशा वातावरणात श्रीमहाराजांचे तेथील वास्तव्य
सर्व स्थानिक ग्रामवासियांना आधार देणारे व मार्गदर्शक असे प्रत्ययास आले.सर्व भक्तांमध्येमध्ये चैतन्य निर्माण झाले.
आपले संपूर्ण जीवन धर्मसंस्थापनेसाठी अर्पण करणाऱ्या
श्रीसखाराम महाराजांना आता स्वरूपी लीन होण्याचे वेध लागले. योगीराज श्रीकल्याण स्वामी परंपरेतील या
सत्पुरुषाने एखाद्या योग्याप्रमाणेच पंचभौतिक देहसंघाताचा त्याग केला. ती कथादेखील विलक्षण आहे. श्रीसखाराम महाराजांनी स्वहस्ते स्थापन
केलेल्या श्रीमारुतीमूर्तीला एक मौक्तिकमाला अर्पण केली. आणि श्रीमारुतीसमोर कठोर अनुष्ठानाला प्रारंभ केला. श्रीमारुतीच्या गळ्यामध्ये घातलेली ती माळ ज्या दिवशी भंग पावेल त्या दिवशी देह ठेवण्याचा श्रीमहाराजांचा संकल्प होता. अनुष्ठान प्रारंभ केल्यानंतर ४०व्या दिवशी ती माळ आपोआप तुटली, तो दिवस होता फाल्गुन शुद्ध अष्टमी शालीवाहन
शके १७६२ ,सन १८४० , याच दिवशी श्रीसखाराम महाराजांनी आपल्या पंचभौतिक शरिराचा त्याग केला. ते श्रीसमर्थांच्या चरणी विलिन झाले.
·
समाधी मंदिर
श्रीसखाराम महाराजांची समाधी भोईगुडा, छत्रीनाका, हैद्राबाद येथे आहे. श्रीमहाराजांनी भोईगुडा येथे जे श्रीमारुती मंदिर स्थापन केले त्याच्या समोरच ही समाधी आहे. समाधीस्थान तळघरामध्ये आहे. समाधीवर शिवलिंग आणि श्रीमहाराजांच्या पादुका आहेत. समाधीचे दर्शन घेण्यासाठी काही पायर्या
उतराव्या लागतात. पावसाळ्यामध्ये समाधीस्थान जलमय होऊन जाते. पावसाळ्याचे दिवस साधारणतः जुलै ते डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष समाधीचे दर्शन घेणे दुर्लभ होते. समाधीचे वरील भागात आराध्यदैवत प्रभु श्रीरामचंद्रांचे मंदिर असून तेथे श्रीमहाराजांच्या चरणपादुका आहेत. तसेच मंदिरामध्ये श्रीसखाराम महाराजांची
जपाची माळ आहे. तसेच श्रीमहाराजांची मूर्ती आहे. मंदिरातील विग्रहांखेरीज विशाल सभामंडप आहे. या समाधी मंदिरामध्ये आजही श्रीसखाराम महाराजांच्या कृपेची अनुभूती येते असा अनेक भक्तांचा अनुभव आहे.
श्रीसखाराम महाराज हे रामदासी परंपरेतील एक अलौकिक महात्मा
होते. ते श्रीकल्याणस्वामींच्या शिष्यपरंपरेतील स्वनामधन्य असे संत होते. त्यांच्याविषयी आधुनिक महिपती संत
श्रीदासगणू महाराजांनी अचूक वर्णन केले आहे की ..
रामदासीयांत मोठाची दिवा | जो की हा सखारामबावा ||
|| जय जय रघुवीर समर्थ ||
No comments:
Post a Comment